अमानवी विल्हेवाट - एक मृत्यू – Delhi Poetry Slam

अमानवी विल्हेवाट - एक मृत्यू

By Vilas Sawant

लाकडांवर लाकडे रचित होती
सरणावर
अविश्रांत, क्लांत ती...

कुणाच्या मदतीने उचलले
कलेवर पतीचे
तिने
करकचून बांधलेले
काळ्या प्लास्टिकात गुंडाळलेले....

विमनस्क पार विस्कटलेली
घामाने डबडबलेली...

शून्य नि सुन्न नजरेने
हातात लाकूड जळतं
दिल पतीच्या मृत शरीराला
त्या अग्नीच्या जिव्हेत...

तोच अग्नी
साक्षीने त्याच्या
वचनाने नि शपथेने
ओथंबलेल्या त्या
सप्तपदी धरला पतीचा हात
हिरवा चुडा नि रक्तवर्णी शालू
लेवून बंदिस्त झाली संसारी
सात जन्माची
देण्यासाठी साथ...

जाणवणाऱ्या तप्त धगधगीची
भ्रांत नव्हती तिला
एकटक नजर त्या
लवलवत्या ज्वालांकडे
तोच तो अग्नी
जिभल्या चाटत
गिळंकृत करीत
ती लाकडे नि
त्यात दिसेनासे झालेलं
भयानक विषाणूने
पोखरलेलं तिच्या
पतीचे प्रेत...

राजधानीच शहर दिल्ली
मृत्यूचं थैमान
इस्पितळातील तोबा गर्दी
रस्त्यावर पथारी
प्राणवायूच्या नळकांड्या
लेवूनी मृत्यूशी झुंजणारी
विषाणूग्रस्त माणसं आजारी...

आजूबाजूला घोंगावणारे
हव्यासी, टाळूवरील
लोणी चाटणारे
त्या विषाणूला लाजवणारे...
बुभुक्षित जीव क्षणाक्षणाला
पैसा उकळीत
बोचून खाल्ले
सगेसोयऱ्यांना गलितगात्र
रुग्णांच्या हात घालुनी
बखळीत....

सैरावैरा धावत
पालथी घालत
इस्पितळामागून इस्पितळे...
विषाणूग्रस्त पतीला
बखोटीला मारून
उपचारासाठी उसन्या बळेबळे...

प्राणवायू फुंकू लागल्या
नळकांड्या
तिच्या पतीच्या कुंडीत
प्रयत्नांची झाली शर्थ...
फुफुसांच्या पोकळीत
गर्दी केलेल्या
विषाणूंनी मात्र
केला अनर्थ....

आकाश कोसळलं
बिथरली भांबावली
प्रचंड ताकदीने
जिवाच्या आकांताने
किंचाळली
उभ्या उभ्याच कोसळली...
मात्र एकही शब्द
फुटेना तोंडून
बसली तिची वाचा
मूक रुदन
असंख्य किंकाळ्यांच्या
लाटा उसळल्या
तिच्या घशातच
अडकल्या, घुसमटली
मूर्च्छेपश्चात क्षणभराच्या
भानावर ती आली...
कुणीही पुसणारं
नव्हतं जाणीव
तिला झाली...
बळेच उठली
सिद्ध उसन्या अवसानी...

सरेना नष्टचर्य नि दुष्टचक्र
मग ती पुन्हा
धावू लागली सैरावैरा
आता बखोटीला मारून
पतीच्या मृत शरीरा...

स्मशानामागून स्मशाने
देशाच्या राजधानीतली
घातली पालथी
रांगाच रांगा मृतांच्या
लांबच लांब
प्रत्येक स्मशानापाशी
झाली मेल्याहून मेली
आयुष्याच्या या बिभीस्त
नि भीषण अनुभवाशी.....

देशभर राक्षसी विषाणू
करी आकांत
निवडणूका, प्रचार धुळवड
धार्मिक मेळे नि उत्सव
सभा, कार्यक्रम नि अर्थार्जन
निलाजरे
भरीस आंदोलने नि धरणे
राजकारण्यांचे बेशरम नाचगाणे...

सरणावरचा तो अग्नी
आता चेतून चेतून
लागला निवू
चितेवरचे काळे ढग
घुसमटून
काजळून गेलं
तिचं आयुष्य..

स्वतःला ढकलत ढकलत
घरी येऊन दिले तिने
झोकून जमिनीवर...
फुटला बांध
फोडला टाहो
अश्रूंचा पूर....

पसरला
तिच्या अवतीभवती
मानवी मृत्यूच्या
अमानवी विल्हेवाटाच्या
संचिताचा काळाकभिन्न धूर......


8 comments

  • 😌 शब्द रचना .. तात्कालिन भयाण जीवघेणी
    ( करोना काल 🐛 ) परिस्थीती शब्दांतून योग्य उतरवली आहे.
    अनाकलनीय असा निसर्गाचा का मानवी चुकांचा ?
    तो दुर्दैवाने एक कोप ? / परिपाकच होता.

    अचानक उद्भवलेल्या परिस्थीतीशी सामना / उपाय योजना करण्यात जनतेची नी सरकारची ही तत्कालीन हतबलता ही मनाला सलवून जाते.

    👍 उत्तम कविता ( सामाजिक विषय )

    Ajay Narayan Satam
  • 😌 शब्द रचना .. तात्कालिन भयाण जीवघेणी
    ( करोना काल 🐛 ) परिस्थीती शब्दांतून योग्य उतरवली
    आहे.
    अनाकलनीय असा निसर्गाचा का मानवी चुकांचा ?
    तो दुर्दैवाने एक कोप ? / परिपाक होता.

    अचानक उद्भवलेल्या परिस्थीतीशी सामना / उपाय योजना करण्यात जनतेची नी सरकारची ही तत्कालीन हतबलता ही मनाला सलवून जाते.

    👍 उत्तम कविता ( सामाजिक विषय ) ✒️📖

    AJAY NARAYAN SATAM
  • Khup chaan👌👏👏

    Annapurna Devulkar
  • Fabulous poem 👏👏

    Spandita Ramesh Salkar
  • Very meaningful poem

    Vinay Nalavade
  • वस्तुस्थितीदर्शक कविता. खूपच छान…आठवले ते दिवस. स्वतःचा जीव स्वतःच वाचवायचा होता. खूप भयानक तो काळ. कोणीच कोणाच नव्हतं. जो तो आपल्या नशिबाचा दावेदार. सगळंच उध्वस्त झालेत. पण आरोग्य यंत्रणा गब्बर झाली.

    Vikas Birje
  • Amazing

    Vallari Sawant
  • Excellent

    Charusheela Chetan Satam

Leave a comment