By Vaishali Baravkar

होऊदे स्त्रीशक्तीचा जागर, होऊदे स्त्रीशक्तीचा जागर,
रणरागिणींचा इतिहास होऊदे आज पुन्हा एकदा उजागर!
स्त्रीसुरक्षिततेच्या हक्काचे आज निघत आहेत वाभाडे,
मूलभूत तुझ्या अधिकारालाही का जावेत असे तडे?
कैक ओढले गेले तुझ्यावर अन्यायाचे आसूड,
जरब बसविण्या त्या आसुरी प्रवृत्तीला, तू दुर्गा बनून हो आरूढ!
तव वयाचीही न तमा राखता, होत आहेत तुजवर अनन्य अवमानास्पद घाव,
भवसागरात ह्या तरायलाच हवी आता तुझी, डगमगणारी नाव!
जन्म का झाला केवळ तुझा अवहेलना झेलण्या?
समर्थ अन सज्ज हो अशी आता तू आव्हाने पेलण्या!
दुर्बल, असहाय्य जाणून तुला धरलं जातंय गृहित,
अधिक सक्षम,सजग, सतर्क होऊन तू जाण आता स्वहित!
फोफावलेल्या बेफाम वृत्तीला तू घाल असा लगाम,
स्त्रीशक्तीचा उध्दार साधण्या, तुझा निर्धार असू दे ठाम!
पेटुनी उठ अशी आता तू, होवून धगधगणारी मशाल,
खाक होवूनी राख होऊदे ती वृत्ती मदमस्त अन खुशाल!
अधिकाराच्या जोरावर स्त्रीनेही स्त्रीवर गाजवू नये सत्ता,
कळत, नकळत तिच्या नालस्तीचा का गिरवावा कित्ता!
नको अवाजवी स्तुतीसुमने, अन तीज सन्मानाप्रती सनई-चौघडे!
पुस्तकांपुरतेच का मर्यादित राहावेत समतेचे धडे?
तिच्या मत, विचारांनाही असावे स्वतंत्र स्थान,
प्रत्यक्ष कृतीतूनच व्यक्त व्हावा तिच्याप्रती सन्मान!
सामर्थ्य तुझे लाव पणाला, दूर करण्या विषमतेची दरी,
कस लावूनी लढ आता तुझी, आहे परीक्षा खरी!