By Shreya Shinde

शरीर जेव्हा सोडून गेले
तेव्हा मला कळले होते
हे माझं ते माझं म्हणता म्हणता
सार इथेच सोडून निघाले होते!
निश्चल पडलेल्या पार्थिवाला जेव्हा
घरात माझ्या आणले होते
येता जाता साऱ्यांनी मला
बॉडी म्हणून संबोधले होते
संपून गेलं सार काही
तेव्हा जणू कळले होते!
हळुवार येणारे रडण्याचे आवाज
आत्ता मोठं मोठ्याने येत होते...
माझ्या पार्थिवाला पाहून
आत्ता हृदय काहींचे पिळवटले होते!
वेळ निघून चालली म्हणून
घाई लोक करत होते...
शेवटची अंघोळ घालायला
नातेवाईकांना गोळा करत होते!
शेवटची अंघोळ घालून मला
नव्या नवरी सारखे सजवले होते!
हिरवी साडी.... चंद्राची कोर लावून
अत्तर आणि फुलांच्या सुगंधाने मी
पुन्हा एकदा बहरले होते!
खांद्यावर घेऊन ज्यांनी मला
मोठ्या लाडाने खेळवले होते
त्याच खांद्यावर घेऊन मला
त्यांनी शेवटचे आज उचलले होते!
अंत्यविधी ला नेले तेव्हा
शरीर माझे जळत होते
लेकीला माझ्या रडताना पाहून
मन माझे ही झुरत होते!
अश्रू तिथे असेही होते
ज्यात केवळ दिखावे होते..
जिवंतपणी नाव ठेवणारे सुद्धा
स्तुती माझी करत होते!
शरीर सोडून मी मात्र
सार काही पाहत होते...
देवाज्ञा झाली तरी
मन अजून तिथेच घुटमळत होते!
प्रॉपर्टी च्या नावाखाली आत्ता
चर्चेला उधाण आले होते...
कुणाच्या वाट्याला काय येणार
याचे तर्क वितर्क सुरु झाले होते!
घरातल्यांचा निरोप घेऊन आत्ता
वर्दळ कमी झाली होती...
रात्रीच्या जेवणाची सोय
शेजार्यांनी मात्र केली होती!
चिरंतर जळणाऱ्या समई कडे
लेक माझी बघत होती..
माझ्याशिवाय ती अपूर्ण
जणू मला ती सांगत होती!
तीच दुःख तिच्या डोळ्यात
मला फक्त्त दिसत होते
बाकी सार्यांना जेवण आटोपून
झोपायचं एवढंच वाटत होते!
शरीर जरी नश्वर असल
आत्मा मात्र अमर होता
प्रत्येकाचा नवा चेहरा
आज मला दिसत होता!