सावळ्याचं रान – Delhi Poetry Slam

सावळ्याचं रान

By Savita Baban Kunjir

सावळा हा शब्द विठ्ठलाला उद्देशून तर, रान हा शब्द वन / जंगल याला उद्देशून वापरला आहे. विठ्ठलाचं वन किंवा जंगल, ज्याने ही सृष्टी निर्माण केली त्यास ह्या कवितेच्या ओळी समर्पित. वसंत ऋतूतील अलौकिक सौन्दर्य जेव्हा नजरेतून सुटलं नाही त्याला शब्दात गुंफून कविता केली आहे.                              

माझ्या सावळ्याचं रान बघ, कसं फुललंय राणी 
पानोपानी नांदतोय, सूर्य नित्य नवा वनी...

पाना फानंदीतून डोकावे, हसरा रंग नवा 
कोवळ्या हिरवाईचा, स्पर्श वाटे हवा हवा...

लख लख चहूकडे, चमकती जसे हिरे 
पाना पानावर रवी, देई  भेट असे वाटे...

लक्ष लक्ष सूर्यबिंब, जणू उगवले पानांनवर 
चमक दमक त्त्यांची देई, कोटी कोटी सूर्यचं बळ…

नवीजुनी उजळली, पानं पुन्हा नव्याने
पाना पानांची चकाकीतुन, भास्कर नवा वाटे…

कोटी सूर्य आरतीला, अवतरे धरणीवर
दृष्ट काळ्याआईची, काढे येऊन माथ्यावर...

टपोऱ्या थेंबांचे तेज, फाकले प्रभेपरी
हिऱ्यांचा दागिना शोभे, धरतीच्या अंगावरी...

दवबिंदूनी केला, हार मोठा रविसाठी 
केशरी रंगाची लाली, आला घेऊन प्रभाती...
 
काळ्या ढगातून भानू, दिसे लोभस गोजिरा
वाटे गोड बाळकृष्ण, लोण्याने माखलेला

कोकिळेनं धरला सूर, भल्या पहाटेला भारी 
आळवते नित्य भूपाळी, म्हणे चला विठूच्या दारी…

गर्द दाट झाडीतून, येते हाक भारद्वजाची 
गरुडाची उंच झेप, शोधे सावली हरीची ...

खारुताई गाई गाणे, मिरवताना इकडे तिकडे 
होई तिची लगबग, हिंडताना वाऱ्यामागे ...

कावळ्यांची भरली शाळा, म्हणे गिरवीन पाठ 
काही मिंटातच संपली, त्याच्या शाळेची भूख...

बघा कसे बिलगून, पक्षी बसले झाडावर
वारा बघून खट्याळ, शीळ घाली  हळुवार...

चिमण्यांनी मांडला, संसार हो त्यांचा
घरट्याच्या काडीसाठी, फिरतो इवलासा जीव तिचा ...

पोपटांची भरली सभा, झाडाच्या फांदीवर
कदंबाच झाड बोले, नको वाच्यता फार ...

निळ्या आकाशाला दिसे भारी, गुच्छ पांढऱ्या ढगानंचा 
दृष्ट काढयला आला, एक काळा ढग पावसाचा...

गवताची पाती कशी, डुलती बघा लयीत
दुःखाच्या गावाशी नाही, म्हणे आमची जवळीक...

इवलीशी खुरटी रोपे, उभी छाताड काढून
पावसाच्या मायेत नाही, दुजाभावाचा आवेग  

नव्या सरींचे आभार, दिसे मज रानोवनी 
इवलिसी रोपं बोले, खुशाल ये मळ्यामंदी...

आरश्याला कसे सांगू, नको न्याहाळू सारखे 
नव्या ऋतूत खुलाला रंग, नका बघू सारखे सारखे...

कशी बहरली धरा , लाल पिवळा हिरवा निळा 
इंद्रधनुष्याची पोटली कुणी, अवनीवर सांडवून गेला...

चाल बदलली वाऱ्याची, वेड्यागत करे तोही 
बिलगत अलगद, स्पर्श सुख घेई तोही...

रानोवनी दिसतो कसा, गर्द हिरवा पदर
आनंदाच्या उधाणाला, नाही उरला पारावार...

पाना फुलातून लावी, माझा विठू मला जीव 
पानं फुल बोले मग, विठू विठू एक नाम...

कुडुलिंबाचा डोलारा, डोलतोय दिमाखात 
ऐट त्याची काय सांगू, जणू भेटतोय ढगास...

कदंबाच्या झाडाखाली, पिवळ्या चेंडूचा पाऊस
बाळगोपाळ विनविती, कान्हा नको सोडून जाऊस...

बेधुंद झाला आसमंत, सांगे चाफ्याच्या कानात
मदहोश मी कशापायी, इतका नको दरवळूस...

चाफ्याची चाफेकळी, काय खुलली खुदकन 
सडा चाफ्याचा हसे, मला बघून खुदकन...

गुलाबांना आली जणू, नवं नवीन तजेली
काटा हसून म्हणे, फुलं माझीच सहेली 

ताम्रवृक्षच्या प्रेमाला, आला बहर पिवळा
लाजून रुक्मिणी म्हणे, आता विठ्ठलाला सजवा ...

भली थोराड झाली, जास्वदींची लाल फुले
गणपतीला वाकून म्हणे, पावसाचे आशिष सारे ...

रक्तांग पळसाचा, झाला लालेलाल भारी
चंदनाच्या झाडाला आली, जोराची भोवळ भारी...

अंगोपांगी माळले त्याने, हजारो पिवळे गजरे
बहावा बघून ओशाळे, हळदीचे हळकुंड पिवळे... 

अंगोपांगी पितांबर, आला लेवून बहावा
हरीच्या भेटीसाठी, कसा आहे हा बहाणा 

मोगरा अंग टाके, म्हणे किती बहरू मी आता
फुलांचा भार माझ्या, सोसवेना मला आता

मोगरा बहरला अति, म्हणे झाला भार डोईजड
गंधाळलेल्या घराशी, कसं नातं अवजड...

बकुळीच्या बहरानी, केला कळस हो आता 
ओंजळ माझी छोटी, मावेना हाती आता...

तप्त उन्हात भरला, मळवट कुंकावाचा
पळसाच्या मनी दाटे, झरा नव चैतन्याचा…

गुलमोहराची लाली, आली उठून तोऱ्यात 
उगा रहा गं बायांनो, सडा पाडतोय नखऱ्यात... 

अमृताची धार भिनली, नसा नसात पिंपळाच्या 
सळसळ धून वाजे, जणू तालावर वाऱ्याच्या...

पान पान भरलंय, किती मी मोजू कळ्या 
ब्रह्म कमळाचं दान, मान्य शंकराला निळ्या...

मधमाशांचे भिरभिरने, कसे झाले बेधुंद 
नशा कशाची बाधली, का झाले मुक्ताछंद...

काय साठवू डोळ्यात, काय साकारू शब्दात 
झाले शब्द थोटे इथे, नाही साठत डोळ्यात 

असा माझा पांडुरंग, वेड लावी सदा आम्हा 
त्याचा प्रेमापायी वाटे, जन्म थोटका आम्हा …

अशी अजीब करणी, आहे माझ्या विठ्ठलाची 
स्पर्श मायेचा त्याच्या , झळकतो रानीवनी...

काय जादू या सरींची, कसा बहरला मळा 
मळ्यामंदी आळवितो,  पांडुरंग सावळा... 


6 comments

  • उत्कृष्ट शब्द रचना, संपुर्ण चित्र कविता वाचताना डोळ्यसमोर उभे रहाते.
    अप्रतिम 💐💐

    Santosh Gawade
  • Khup Chan 👍🏼✌🏼👌🏼

    Mahesh
  • खूप छान

    Ramdas
  • खूप छान… 🖊️

    Prabhu T
  • Great

    No words to express

    Jitendra
  • अप्रतिम वर्णन ❤️☀️

    सीमा

Leave a comment