अरे देवा! – Delhi Poetry Slam

अरे देवा!

By Rajiv Bahutule

देवा खर सांगायच तर तुझं, मला काही कळतच नाही;
लहानपणापासूनचा पगडा म्हणूनच फक्त, चित्त तुझ्यापासून ढळत नाही.

पदोपदी हात जोडून, मी मदत तुझी मागतो;
पण एकदाही येत नाहिस मदतीला, आणि मग मीच मार्ग काढतो.

पापाच्या भितीने मी नेहमी, चांगल असंच वागतो;
पण तुला मात्र पापी लोकांनाच, मदत करताना बघतो.

गरीबाच्या मदतीला आलेला असा तू ,मला क्वचितच दिसतो;
श्रीमंताच्या श्रीमंतीत भर घालतानाच, नेहमी मी तुला पाहतो.

श्रीमंत लोकही तुला मोठं, गुप्त दान देतात;
आणि आपसुकच तुला आपल्या, पापात सामिल करुन घेतात.

सामान्य जनता तुझ्या दर्शनासाठी, तासनतास थांबते;
आणि श्रीमंतांची स्वारी मात्र गाभाऱ्यात तुझ्या, एका मिनीटात पोहोचते.

तु नसल्याचा भास, होऊ लागतो जेव्हा;
तुझं दर्शन घेऊन निघालेल्यांनाच, तु तुझ्या घरी बोलावतोस तेव्हा.

एवढं सार असूनही तुझ्या, अस्तित्वावर विश्वास मात्र बसतोच;
जेव्हा लहान लहान मुलांच्या रुपात, तूच गोड हसताना दिसतोस.

जेव्हा समुद्राच्या लाटांनी, तू सगळ्यांशी बोलतोस;
तेव्हा तुझ्या असण्याची जणू, झलकच तू दावतोस.

चराचरातील अद्भुदता, प्रचीती तुझ्या,महानतेचीच देते;
आणि निसर्गाची प्रत्येक सुंदर छटा, फक्त तुझ्याच साक्षीने येते.

साऱ्यांना वाटत तु फक्त, पुण्यवान माणसालाच दिसतोस;
पण मला वाटत प्रत्येकालाच तु, प्रथम आईच्या रुपात भेटतोस.


Leave a comment