अनंत जन्मींचा शोध त्याचा – Delhi Poetry Slam

अनंत जन्मींचा शोध त्याचा

By Kalika Bapat

अनंत जन्मींचा शोध त्याचा
आत्मशोधास्तव चाललेली धडपड
आत्मानुभवातून गवसलेली आत्मानुभूती
केवळ त्याच्या...त्याच्या शोधासाठी
स्वानुभवातून केलेली निस्सीम भक्ती
ती मधुरा भक्ती म्हणावी कि आत्मशक्ती...
तिने किती सहजच उलगडविले
उलगडविले तिच्या आयुष्यातील
आयुष्यातील पुस्तकाचे ते कोरे पान
त्यात आत्मभान...हो मयूरतान
सुरलयीचा साक्षात्कार
साक्ष म्हणून त्यात ठेवलेले मोरपीस
अनंत जन्मापासूनची ती खूण
नक्षीदार मोरपिसावर व्यापून राहिलेली ती निळाई
त्या निळाईतला तो देखणा लोभस

अतिशय विलक्षणसा भुरळ घालणारा चेहरा
शांत अविश्रांत मौनाचा ध्यास ज्यास
तिच्या कवितेवर गारुड ज्याचे
तिच्या शब्दाशब्दावर अधिराज्य ज्याचे
मन तार तार परेच्या आर पार वैखरीतून निघणारा
असा कुठला स्वर कंठात त्याच्या
ज्याचा शोध अनंत जन्मापासून
त्याची कोऱ्या कागदावर उमटलेली चित्रछाया
असुनी मान्य तो गवसणार नाही कधीच
कोण विलक्षण ध्यास हा जन्मोजन्मीचा
असावा असा, सखा जसा राधेचा...

 


Leave a comment