By Gayatri Gaware
संघर्षातूनच अभेद्य अशा
यशाची शिखरे सर करता येतात
या संघर्षाच्या काटेरी वाटांना
आपल्या प्रयत्नरूपी सुगंधाने
भारून टाकत वाट सर करता येते.
हे म्हणणे जरी खरे असले तरी
संघर्षाची वाट ही वेदनादायीच असते
या वाटेने जीवनातील कितीतरी वेळ,
व्यक्तीतील सालसता, विचार, उमेदीची महिने-वर्ष हिसकावून घेतलेली असतात
संघर्ष हा बिकट परिस्थितीशी दोन हात कसे करायचे,
कसा मार्ग काढायचा हे शिकवत असला तरी
यात मनाची कोमलता, विचारांची सरळता, चांगुलपणा, स्वभावातील मधुरता या सर्वांनाच क्षणोक्षणी तिलांजली देत नकारात्मकतेचे बीज पेरण्याचा जणू मार्ग बनतो.
वास्तवाचाच परंतु सकारात्मकतेच्या आशेचा पतंग
आनंदाने, प्रयत्नाने उंच-उंच उडत राहतो आणि मध्येच एखादा मांजा आपल्या आशेच्या पतंगाला छाटून जमीनदोस्त करायला बघतो.
अशावेळी हवेत दिशाहीनपणे भरकटणे म्हणजे संघर्ष
स्वतःचे अस्तित्व विसरायला लावणाऱ्या संघर्षातून ती जमीनदोस्त होऊ घातलेली पतंग जर पुन्हा हाती आलीच तर चेहऱ्यावर एक विलक्षण आनंद आणते आणि पुन्हा मोठ्या जोमाने दिमाखात हवेत गगन विहार करण्यास सज्ज होते
आता हे जरी खरे असले तरी
हवेत भरकटत मार्ग काढण्याचा संघर्ष वेदनादायीच
संघर्षाची फळे जरी गोड असली तरी तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रवास कठीणच
यात साथ देणारे तसेच योग्य मार्ग दाखवणारे कोणी असणे हे म्हणजे संघर्षामुळे
होत असलेल्या वेदनेवरील फुंकरच
जणू विश्वासाने जगताना पाठीवर दिलेली आधाराची भक्कम थाप
संघर्षाचा शेवट म्हणजेच यश,
यश मिळेपर्यंत रिसेट, रिस्टार्ट आणि रिफोकस हे तंत्र आत्मसात करत आशावादी राहणे हाच संघर्षाच्या मार्गातील महत्त्वाचा टप्पा
रोज नित्य नवे प्रश्न अन् नित्य नवी उत्तरं
त्यासाठी नित्य नवा संघर्ष
कारण सर्व सहज संघर्षाशिवाय मिळेल,
इतक पण आयुष्य सोपं नसतं
आणि संघर्ष करूनही काहीच साध्य होणार नाही
इतकंही ते अवघड नसतं
इतकंही ते अवघड नसतं