आई ऐकतेस ना ग! – Delhi Poetry Slam

आई ऐकतेस ना ग!

By Anjali Warkari

आर्त हाक गर्भातुन
आई, ऐकतेस ना ग!
कण कण वाढते मी
तुला भासतेच ना ग!

आई, तुझ्या लेकराला
आज देतेस ना ग्वाही,
असो विरोध कितीही
गर्भ पाडणार नाही.

नाही ओझं घरावर
कर वंशात गणती,
तेवी शीतल ज्योतीने
जशी राऊळी पणती.

शिकू दे मलाही फार,
घेऊ दे नभी भरारी,
बळ पंखात घेऊन
येई जीवनी उभारी.

नको समजू मला ग
धन परक्या घराचे,
काठी मीच वार्धक्याची-
बोल ऐक हे धीराचे.


Leave a comment