By Snehal Kadam
आहेस तु स्वर्गीय सौंदर्य ल्यालेलं गुलाब
पण विसरू नकोस,परजतेस तू काटेरी तलवारीही
करिता सायास कुणी खुडावयाचा,
डगमगू नको रूधिर त्याचे प्राशण्यासही
आहेस तु शांत, संयमी अन् सहनशील सरिता
पण विसरू नकोस, लपल्यात तुझ्यात रौद्र लाटाही
करिता सायास कुणी अव्हेरण्याचा
डगमगू नको देण्यास त्यास जलसमाधी
आहेस तु वत्सल, क्षमाशील धरणीमाता
पण विसरू नकोस, तेवतोय तुझ्या गर्भात अग्नीही
करिता सायास कुणी शील हरणाचा
डगमगू नको त्यास भस्म करण्यासही
आहेस तु प्रेम अन् कारुण्याची देवता
पण विसरू नकोस, आहे तुझ्यात त्या शक्तीचे शौर्यही
करिता सायास कुणी अस्तित्त्व मिटविण्याचा
डगमगू नको त्यास संहारण्यासही.