केशरी पहाट

By Savita Baban Kunjir

क्षितिजावर सांडला , केशराई रंग नवा
दवबिंदूत भिजला, विहंगांचा संथ थवा

चुलीवरच्या पाण्याची , उब ऊबदार भारी
जळताना काड्यांची ,होते लगबग सारी

सडा शिंपला अंगणी, सुबक रांगोळी दारी
दान लक्ष्मी देत असे , वाटे कुबेराला भारी

तुळशी पाशी तेवते, मंद मंद तूप वात
इवलासा दिवा सांगे, झाक ना तू अंतरात

ओल्या केसांचा अंबाडा , डोईवर दिसे भारी
लावण्याची अप्सरा , सदोदित नांदे दारी

घंटा बांधून गळ्याशी ,कळप धेनूंचे निघाले
कण धुळींचे न्हावून , कोवळ्या उन्हात निघाले

देवघर गंधाळाले , जाईजुई देवाठायी
चंदनात न्हाऊ पाहे , पांडुरंग भक्ता पायी

जात्यावर आत्याबाई, ओवीवर ओवी गाते
मूठ मूठ देते दाणे , दान मुक्तीच मागते

उसळात कुटे कण्या , लयीमध्ये काकूबाई
मंथनात लोण्याच्या , विसळून निघे साई

दिस आला उगवून, घेऊन नवी उभारी
बाया बापड्याची, लगबग दिसे न्यारी

रम्य अश्या पहाटेला, साज केशरी नवा
घरा घरात होतसे, मनी मानव नवा Savita BK


Leave a comment