BY PRADNYA BELKHODE
अमेरिकेने जपानला बेचिराख केलं
जपानने चीनला कधीकाळी छळलं
चीनने जगाला वेठीला धरलं
फ्रान्सने आफ्रिकेत गुलामगिरी नेली
रशियाने युक्रेनला खुन्नस दिली
ब्रिटिश साम्राज्याने जग लुटलं
जर्मनीत संहाराचं वादळ उठलं
मध्यपूर्वेत रक्ताचं शिंपण झालं
जगण्याभोवती काटेरी कुंपण आलं
एका फिरत्या जिवंत गोलावरचे
हे अनेक देश त्यांचे अनेक वेश
जगातल्या अनेक प्रदेशांमध्ये
इतर माणसांना बंद प्रवेश
असंख्य वेळा आक्रमणं झाली
संस्कृतींची घुसळण झाली
शतकानुशतकांच्या उलथापालथीतून
माणसाच्या हातात काय पडलं?
माणूसपणाला समृद्ध करणारं
शाश्वत असं काय घडलं?
जिथे तिथे दिसतात युद्धाचे ढग
काळवंडून जातं मग मनातलं जग
एक युद्ध होतं, खूप माणसं मरतात
विस्कटलेल्या मनांची खूप मागे उरतात
एक युद्ध होतं, डोळे जातात विझून
सडणाऱ्या विचारांचा वास पसरतो कुजून
एक युद्ध होतं, मग सारं काही सुन्न
केविलवाण्या हातांमध्ये पाकिटातलं अन्न
एक युद्ध होतं, जळतात लाखो स्वप्नं
उत्तरांची होते राख धुमसतात नुसते प्रश्न
एक युद्ध होतं, मग सीमा किंचित स्पष्ट
चांगले ते चांगलेच राहतात, आणि दुष्ट ते दुष्ट
एक युद्ध होतं, आता पुढे काय?
तुटतात काही नाती, जुळतात काही पर्याय
एक युद्ध होतं, मग सारं शांत शांत
गप्प होतात आकांत आणि स्वप्नं परत जिवंत
एक युद्ध संपतं पण कुणालाच कळलेलं नसतं
याच युद्धात पुढच्या युद्धाचं बीज रुजलेलं असतं!