By नोमेश मेश्रा
प्रेम करावे! प्रेम करावे!!
धरणीपासून दिगंतराशी
ऐलतीर ते पैलतीराशी
उगमापासून अंतापाशी
प्रेम करावे! प्रेम करावे!!
प्रेमा नसावी सीमा मुळीही
अथांग नि अखंडीत असावे
ओतप्रोतिल्या जलकुंभासम
प्रेम करावे! प्रेम करावे!!
एकलव्याला प्रियवर कमठा
मातेचे तान्हुल्यावरती
रविकिरणांचे जैसे धुक्याशी
प्रेम करावे! प्रेम करावे!!
जिथे अविचल श्रद्धा भक्ती
तिथे प्रेमवीरांची वस्ती
प्रेमाने प्रेमास भजावे
प्रेम करावे! प्रेम करावे!!
चंद्र तारका नष्टतील जरी
प्रेम अमर राहील भूवरी
धूर उरातून निघेस्तोवर
प्रेम करावे! प्रेम करावे!!
मातेवरती, मातीवरती
भूमातेच्या सपुतांवरती
आपुलकीच्या सकळांवरती
प्रेम करावे! प्रेम करावे!!