धरणाचे अश्रू – Delhi Poetry Slam

धरणाचे अश्रू

By Deepak Kumbhar

किर्रर्र झाडी, सभोवताली डोंगरदरी
डोंगराच्या खोबणीतून उधळणारी नदी
पडायचा पाऊस बेदम
कानात वारं शिरलेल्या वासरासारखा
डोंगराच्या खाली शिकलेली
डोंगरात राहणारी आम्ही
उघडी नागडी

खालच्या लोकांना हवं होतं
पाणी बेत ठरला धरणाचा,
इमले बांधले विकासाचे
दाखवली स्वप्न जमिनीची नि सरकारी नोकरीची
वरच्या डोंगरातल्या लोकांना
कागूद आला, यंत्रबी आली
डोळ्यात स्वप्न घेऊन
तीळतीळ तुटला जीव
गाव सोडताना
किडूक मिडूक गोळा केलं
पण आठवणींचं घर तिथंच राहिलं

दिसामागून दिसं गेली
कागदांची भेंडोळी सुद्धा करपली आता
कित्येक चपला झिजल्या
३०, ४०, ५० वर्ष झाली
ना मिळाल्या नोकऱ्या ना जमिनी
सपान सपानच राहिलं
आंदोलन करतंच राहिलो
आंदोलन करतोच आहे...
निदान आमचं होतं तेवढं तरी मिळावं म्हणून

आता येतो भर उन्हाळ्यात
पोराटोरांना घेऊन बुडालेलं गाव दाखवायला
शेवाळलेल्या पडक्या भिंती
नि दारात अजूनही उभे असलेले वृंदावन बघायला
बोडक्या धरणात पडणाऱ्या
डोळ्यातील ठिबकणाऱ्या आसवात
मी माझं घर शोधतो

परत आल्यावर जगाला ओरडून सांगावंसं वाटतंय्
ते पाणी माझं आहे
तिथं बुडालेला गाव माझा आहे
कारण
त्या पाण्यात माझ्या स्वप्नांच्या अश्रूंचा अंश आहे...


Leave a comment