By Anjali Gadekar
कोण आहे रचिता या वसुंधरेचा
खेळ कुणा न कळे या गूढ शक्तीचा…
रोम रोमी निर्मियले रोज नवे श्वास
जागोजागी पाहियले सदा कुणाचे भास
कोण रेखाटतो आविष्कार हा सृजनाचा
कलाबुत पाहता नूर पालटे मनाचा…
मेघात भरे पाणी, शिंपल्यात येती मोती
भाग्य पौर्णिमेचे आहे अवसेच्या ललाटी
कोण देतो सुगंध पोळलेल्या या धरेला
न्हाऊन प्राक्तनात कोंब येतो संचिताला…
उन्हाची शलाका कधी रात्र पावसाळी
नित्य नव्या योजनांनी भरतो तो ओंजळी
कोण घेतो काळजी इथल्या कणाकणांची
चिऱ्यातून फुलणाऱ्या एका वेड्या रोपट्याची…
शिणलेल्या पावलांची वाट करतो सोपी
कुशीत कुणाच्या जग शांत जाते झोपी
कोण जोजावितो सर्वांना गाऊन अंगाई
लिहून कहाणी कर्माची होतो तो सवाई…
ज्याच्या त्याच्या मापाचा देतो कसा पिंजरा
ठेवतो कसा आत्म्यावर शरीराचा पहारा
कोण मोजतो अचूक श्वासांमधले अंतर
जन्म मृत्यूच्या फेऱ्या होतात कशा निरंतर…
दिशा दिशात व्यापले रूप तुझे अनिवार
कठीण समयी आहे तुझ्या भक्तीचा आधार
कोण आहेस तू? कोठे तुझे घरदार आहे?
कशाला मापू मी तुला? भोळी माझी श्रद्धा आहे…